बुधवार, ९ जानेवारी, २०१३

                                          भारतीय साप 

 

साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांती मध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल जनमानसात भीतीची भावना आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. विषारी साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशीही वर्गवारी होउ शकते.

      हा ब्लॉग केवळ भारतीय सापांबद्दल माहीती देणारा आहे, या  मध्ये भारतीय सापांच्या जातिन्बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.भारतात विविध प्रकारचे साप आढळतात, त्यांच्या जाती खालील प्रमाणे.
विषारी साप
 • नाग
 • नागराज
 • मण्यार
 • फुरसे
 • घोणस
 • समुद्री साप
 • पोवळा
 • पट्टेरी पोवळा
 • चापडा

बिनविषारी साप

 • अजगर
 • धामण
 • तस्कर
 • गवत्या
 • वाळा सर्प
 • पाणसाप
 • हरणटोळ
 • दिवड 
 • नाणेटी  
 •  
   

विषारी साप:

    नाग Common cobra (Naja Naja Linnaeus-1758)

नाग हा भारताच्या उत्तरपूर्व आणि हिमालयात सोडून भारतात सव ठिकाणी सापडतो.
नागाला  भारतीय कायद्याच संरक्षण आहे (Schedule-II Part-II of WLPA-1972)नाग हा विषारी  साप आहे. नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monocol) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणी पक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.. नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.     नागाची जास्तीती जास्त लांबी २.२ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. नाग हा धामण आणि खाई इतर बिन विषारी सापन्सारखा दिसत असल्याने त्यांना बघून नाग पहिल्याच गैरसमज होतो.
     नाग (Cobra) याच विष हे अत्यंत घटक असल्याने, तो भारतातील ४ कुप्रसिद्ध सापांपैकी एक आहे. ज्यांना पहिल्या पहिल्या मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. नागाला कित्येकदा घराभोवती शेतामध्ये पहिले जाते, उंदीर आणि इतर कुर्तडनाऱ्या  प्राण्यान्मागे  तो येतो, अचानक अडवले असता अगोदर तो फना काढून धमकी देतो परंतु, त्यावर पाय ठेवल्यास किव्वा इजा केल्यास तो डसतो.
     नागाच्या विषावर इस्पिताल्न्मध्ये औषधे उपलब्ध आहेत. अनेक वेळा ग्रामीण भागा मध्ये उपचाराऐवजी  घराची घरीच आयुर्वेदिक पद्धती अवलम्बल्या मुळे मृत्यू होतो. 

__________________________________________________________________________    
नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)

 

नागराज हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑस- साप ; फॅगी- खाणे) असे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नाग, अॅाडलर , आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतो. त्याची लांबी सु. ५.६ मीटर असते. भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूर, कोइमतूर, निलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहे. दक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. त्याच्या नावात नागहे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाही. त्याचे प्रजातिनाम वेगळे आहे. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.
नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासते. इतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येते. वरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतात. यामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येते. नर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतो. नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.
ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहे. इतर नाग नाजाप्रजातिमधील आहेत. इतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. त्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते. नागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले. डोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.
इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होते. या कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतो. त्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतो. दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतो. त्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.
मानवी संपर्क नागराज सहसा टाळतो. पण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभाव. नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतो. नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो. त्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतो. आणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतो. एका वेळा तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.
सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामण, लहान अजगर, सर्व विषारी साप असतात. साप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, पक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.
नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असते. चावा घेताना विषाचे दात शरीरात १.२५ ते १.५० सेमी. घुसतात. विषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हृदयक्रिया बंद होणे , कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतो. नागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा १.६ मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहे. एका अभ्यासात चिनी नागराजाच्या ०.३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहे. नागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावते. सरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतो. नागराजाने दंश केलेल्या ७५% व्यक्ती मरण पावतात. सध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेत. थायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.
नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतो. जंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते. जवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावते. पानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असते. अंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. आपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतात. त्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असते. पिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.

_______________________________________________________________________________


मण्यार  Common Krait and Banded Krait  (bungarus caeruleus)लांबी: पिलांची लांबी १०-११ इंच असते, तर प्रौढ साप ४ फुटा पेक्षा मोठा अस्तु, जास्तीत जास्त लांबी ५.५ फुट मोजली आहे.
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे[१]. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली सरडे, इतर छोटे साप बेडूक इत्यादी आहे
विष: मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो[. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

______________________________________________________________________________घोणस Russell’s Viper (Daboia Russelli)


घोणस हा भारतातील एक Viper जातीचा साप आहे, तो उत्तर पूर्व भारत सोडून संपूर्ण देशात आधालातो. पहिल्यांदा पाहून तो अनेकांना अजगर असल्यासारखे वाटते. घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा आणि त्याचे बेडकासारख्के तोंड. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.  
घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
विष: घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे.

____________________________________________________

 

चापडा  Bamboo Pit Viper (Trimeresurus Gramineus)

 चापडा किंवा हिरवा चापडा हा भारतातील सुद्धा एक Viper जातीचा साप आहे,  हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर राहतो. हा साप घोणस प्रमाणेच अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. हा साप प्रामुख्याने दक्षिण भारतात सापडतो, महाराष्ट्रातील कोकण, बोरिवली राष्ट्रीय उद्यान येथे सापडतो.

____________________________________________________
____________________________________________________बिनविषारी साप:
 

अजगर Indian Rock Python (python molerus molerus) 

 अजगर हा भारतात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.
पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्टपणे दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायांची घटलेली हाडेसुद्धा असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.
हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर  त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.
जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी ८ - १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांसाठी ऊब निर्माण करते.
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.
फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.
_______________________________________________________धामण Rat snake (Ptyas mucosus)


हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस  आहे. सर्व भारतभर तो आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी १,८३० मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर सापडतो.
हा दांडगा आणि भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २·२५ ते २·५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट लांबीच्या एकचतुर्थांश असून टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून  स्पष्टपणे वेगळे असते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळया असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा (कनीनिका) सोनेरी असतो. नाकपुड्या मोठ्या असतात. पाठीचा रंग हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीराच्या पुढील भागावरील खवले एकाच रंगाचे असतात; पण मागच्या बाजूला पुष्कळ खवल्यांच्या कडा काळ्या असतात. यामुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. पाठीवरील काही खवल्यांवर बारीक कणा असतो. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट किंवा पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.
धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत आढळणारा नित्यातला साप आहे. घरांच्या जवळपास तो दिसतो. मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो; पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती, झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. तो उत्तम पोहणारा असून झाडावर चढण्यात तरबेज आहे. पाण्याच्या जवळपास राहून तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे. 
शक्यतोवर माणसाचे सान्निध्य तो टाळतो; पण त्याला कोंडीत पकडले, तर त्वेषाने हल्ला चढवायला तो कमी करीत नाही. हल्ला चढवताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून तो प्रहार करतो व चावतो. पुष्कळ मोठा व भयंकर दिसणारा असला, तरी तो मुळीच विषारी नाही. हा चलाख असून याच्या सगळ्या हालचाली शीघ्र गतीने होत असतात.
या सापासंबंधी बऱ्याच समजुती प्रचलित आहेत : धामण हा नागांचा नर आहे; गायीचे किंवा म्हशीचे आचळ तोंडात धरून तो सगळे दूध चोखून घेतो, नंतर आचळाला दंश करून तिला ठार करतो किंवा आपले शेपूट गायीच्या किंवा म्हशीच्या नाकात खुपसतो आणि नंतर ते जोराने बाहेर काढून तिला मारतो; चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला चावला, तर तो आंधळा होतो इत्यादी. या सगळया समजुती चुकीच्या आहेत.
हा अंडी घालणारा साप असून पिल्ले पावसाळयात अंडी फोडून बाहेर पडतात. धामण ज्या टायास  वंशातली आहे त्याच वंशाच्या पट्टेरी धामण (टायास फॅसिओलेटस) व वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती भारतात आढळतात.
_________________________________________________________________
तस्कर Common Trinket Snake (Elaphe helena)

   तस्कर जम्मू काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारत सोडून संपूर्ण भारतात सापडतो. (शास्त्रीय नावःElaphe helena) हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. 

 हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत
  छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी हा साप खातो.
_____________________________________________________________________________गवत्या ( Green Keel back )

गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो.
गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.
बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात.
गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात.

_____________________________________________________________________________वाळा (Ramphotyphlops braminus)

वाळा हा भारतात  सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो.

 वाळा साप लालसर लपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.
 महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.
 वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.
 वाळा मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या खातो. वाळ्यांमध्ये अंड्यांद्वारे प्रजनन होते. सर्वसाधारणतः ३-७ तांदळाच्या आकाराची अंडी घातली जातात.
___________________________________________________________________


हरणटोळ (Green Vine Snake)

 

हरणटोळ हा भारतात जंगलांमध्ये सापडतो. हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो,
हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो, त्यची जीभ हि लांब आणि गडद हिरव्या रंगाची असते जीने तो आजूबाजूच्या स्तिथी चा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.
एका वयस्क हरणटोळ चा घेर २ सेमी असून लांबी २ मीटर पर्यंत वाधू शकते. तो आपल्या लांब शेपटी चा वापर झाडावर चडताना किव्वा शिकार करताना माकडा सारख्या फांद्यांना पकडायला वापरतो. दुसऱ्या सापांपेक्षा याचे डोके लांब असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.
हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला वाचवण्यासाठी पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगाच्या झाडांमध्ये गायब होण्याच्या सवयीवर अवलंबून असतो. हरणटोळ हा पाली. सरडे. बेडूक आणि इतर कुर्ताडणाऱ्या प्राण्यांना खातो. तो आपल्या भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळून खातो.
हरणटोळ हा माध्यम विषारी साप आहे, जरी त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो तर मोठ्यांना माधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाला नाही आहे.
आजकाल हरणटोळ हा अनेक ठिकाणी पेट म्हणून ठेवण्यात येत आहे, जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते. बाजारात सुद्धा त्यची विक्री होण वाढलेलं आहे, त्वचेच्या रंगामुळे लोकांच्या पसंतीस आल्यामुळे घरात पाळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचे दुष्परिणाम मात्र सापाच्या जंगलातील संख्येवर आणि बंदिस्त अवस्थेत त्याच मरण्यात होत आहे.
_______________________________________________________________________डुर्क्या घोणस (gonglyophis conicus)हा एक साप असून त्याला कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून ⇨ अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.


डुर्क्या घोणस भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे याला विशेष मानवते. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप आहे असे काहींचे म्हणणे आहे, पण मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही (उदा., पश्चिम घाटात) तो आढळतो.


याची लांबी ३०-७५ सेंमी. असून शरीर जाड असते; शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले आणि फक्त २५-४० मिमी. लांब असते, त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते; पाठीकवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही नमुन्यांचा रंग काळसर असून पाठीवर करडया रगाचे विषयम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.


डुर्क्या घोणस विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.


या सापाच्या वर्णनात काही ठिकाणी `हा साप अंडज असून मादी उन्हाळयात अंडी घालते' असे आणि याच्या उलट काही ठिकाणी, `हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात, असेही म्हटलेले आढळते. दुसरे विधान खरे असावे असे दिसते.
_________________________________________________________________________ 


कुकरी (oligodon arnensis)

या सापांचा कोल्युब्रिडी सर्पकुलात समावेश होतो. यांच्या एकूण ४० जातींपैकी सु. १३ भारतातील आहेत. यांतील काही जाती भारतात सर्वत्र सापडतात आणि बाकीच्या निरनिराळ्या भागांतच दिसून येतात.

हे बिनविषारी साप लहान असून त्यांची लांबी ३० – ६० सेंमी. असते. इतर सापांच्या मानाने यांना थोडे दात असतात. वरच्या जबड्यातील मागचे काही दात गुरख्यांच्या कुकरीच्या आकाराचे असल्यामुळे यांना ‘कुकरी’ साप म्हणतात. हे चपळ असून भित्रे नसतात. सरडे, पाली व त्यांची अंडी यांवर ते उदरनिर्वाह करतात.

भारतात सगळीकडे आढळणारी सामान्य जात ऑलिगोडॉन आर्नेन्सिस  ही आहे. ही महाराष्ट्रात पुष्कळ सापडते. शरीर तपकिरी असून त्यावर २०—६० काळे आडवे पट्टे असतात; त्यांपैकी ६—१२ शेपटीवर असतात. पोट पांढरे असते. डोक्यावर ^ च्या (उलट्या रोमन व्ही अक्षराच्या) आकाराच्या लागोपाठ तीन खुणा असतात म्हणून या सापाला ‘त्रिशर’ म्हणतात.

हा नेहमी आढळणारा साप असला तरी पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात असतो पण सु. १, ६७५ मी. उंचीवरही आढळलेला आहे. याला डिवचल्यावर चिडून तो आपले सगळे शरीर खूप फुगवतो. मादी अंडी घालते. ऑलिगोडॉन  वंशातील आणखी एकदोन जाती महाराष्ट्रात आढळतात.
_______________________________________________